Sat. May 30th, 2026

संगमनेर:

संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे हे बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना-भाजप महायुतीने केला आहे. या गंभीर तक्रारीची दखल घेत महायुतीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन डॉ. मैथिली तांबे यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याची अधिकृत मागणी केली असून, या प्रकारामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाने ५० टक्के आरक्षण दिले असून, महिला प्रतिनिधींच्या कामात त्यांच्या पतीला किंवा नातेवाईकांना हस्तक्षेप करण्यास कायद्याने मनाई आहे. मात्र, संगमनेर नगरपालिकेत या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे महायुतीचे म्हणणे आहे.

आमदार सत्यजित तांबे हे प्रत्यक्ष नगरपालिकेत उपस्थित राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतात, असा दावा शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केला आहे. ही बाब लोकशाही मूल्यांच्या आणि प्रशासकीय नियमांच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम ४४ नुसार, लोकप्रतिनिधींची कृती कायद्याविरुद्ध असल्यास मुख्याधिकाऱ्यांना त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे अधिकार आहेत. याच अधिकाराचा वापर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि नगराध्यक्ष पद रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

या शिष्टमंडळात शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे यांच्यासह अजित जाधव, विशाल एनगंदुल, अक्षय वर्पे, सिद्धार्थ तुरकने आणि अनिकेत चांगले यांसारखे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ झाल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आता या प्रकरणावर पालिका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!