Sat. May 30th, 2026

संगमनेर:

तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आल्याने राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील वीज प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महावितरण प्रशासनाने ५ एमव्हीए क्षमतेचा जुना ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी १० एमव्हीए क्षमतेचा नवीन उच्च क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून स्थानिक नागरिकांची आणि शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील वीज उपकेंद्रांवर ग्राहकांची संख्या आणि विजेची मागणी वाढल्याने अतिरिक्त भार निर्माण झाला होता. यामुळे शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा वारंवार विस्कळीत होत होता. कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीपंप जळण्याचे किंवा वारंवार बंद पडण्याचे प्रमाण वाढले होते, ज्याचा थेट फटका पिकांना पाणी देण्यावर आणि एकूण शेती उत्पादनावर बसत होता.

ही समस्या लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीची दखल घेत युद्धपातळीवर काम पूर्ण करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला आहे.

आमदार खताळ यांनी केवळ राजापूरच नव्हे, तर तालुक्यातील इतर महत्त्वाच्या उपकेंद्रांकडेही लक्ष केंद्रित केले असून अनेक ठिकाणी १० एमव्हीएचे ट्रान्सफॉर्मर २० एमव्हीए मध्ये रूपांतरित केले आहेत. या नियोजित बदलांमुळे ट्रान्सफॉर्मरवर येणारा अतिरिक्त ताण दूर झाला असून शेतकऱ्यांना आता मुबलक आणि उच्च दाबाने वीज मिळणे सुलभ झाले आहे.

शेतकरी हा कष्टाने पीक घेतो आणि केवळ वीज समस्येमुळे त्याचे नुकसान होऊ नये हीच आपली प्राथमिकता असल्याचे सांगत, आगामी काळातही वीज प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला आहे. या सुविधेमुळे परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आमदारांचे आभार मानले आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!