Wed. Apr 1st, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी किनारी असलेल्या शिवप्रभात ट्रस्ट देवस्थानच्या भक्तनिवासात रविवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊराव विठ्ठल बाचकर (वय ३५, रा. करकवाडी वावरथ जांभळी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे.

सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना भक्तनिवासातील सभामंडपात बाचकर यांचा मृतदेह रक्ताने माखलेला आढळला. त्यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त साचले होते. घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठसा तज्ञांचे पथकही दाखल झाले होते.

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात मृतदेहाजवळ एक दगड आणि तुटलेल्या बांगड्यांच्या काचा आढळल्या. या संशयास्पद वस्तू पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत. बाचकर हे शनिवारी सायंकाळी लिंबफाटा येथून शिवमंदिराकडे गेले असल्याची चर्चा आहे.

हा खून आहे की घातपात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरातील नागरिकांकडून यामागे काहीतरी मोठे कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून, घारगाव पोलीस या घटनेचा कसून आणि सखोल तपास करत आहेत. तपासाअंती बाचकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!