Wed. Apr 1st, 2026

श्रीरामपूर: निर्मळ पिंपरी येथे १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान आयोजित केलेल्या शिव महापुराण कथेच्या निमित्ताने देश-परदेशातून आलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करण्याच्या आणि दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्यीय टोळक्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी एकूण २३ महिला आणि ३ पुरुष अशा २६ आरोपींना अटक केली आहे. हे चोरटे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमधील आहेत. त्यांच्या विरोधात लोणी (राहाता) आणि शिर्डी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, सर्व आरोपींची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ही माहिती दिली.

कथेदरम्यान मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी अमोल भारती (शिर्डी), डीवायएसपी जयदत्त भवर (श्रीरामपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पायी गस्त, हॉटेल-लॉज चेकिंग, नाकाबंदी आणि संशयितांवर पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती.

पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या चार स्वतंत्र कारवायांमध्ये हे आंतरराज्यीय टोळके पकडले. शिवमहापुराण कथेनिमित्त निघालेल्या प्रदीप मिश्रा यांच्या मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या ६ महिलांना साईबाबा मंदिराच्या परिसरात ‘कटर-ब्लेड’सारख्या घातक शस्त्रांसह अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दुसरी कारवाई १२ ऑक्टोबर रोजी पिंपरी ते लोणी रस्त्यावरील न्यू इंग्लिश शाळेजवळ करण्यात आली. यात पोलिसांनी १३ जणांना पकडले. हे सर्वजण घातक शस्त्रांसह चोरी आणि दरोड्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून ‘स्विफ्ट डिझायर’ गाडी आणि घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांच्याविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तिसऱ्या कारवाईत १४ ऑक्टोबर रोजी साईबाबा मंदिराच्या ‘सोळा गुंठे’ परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोरी-दरोडा घालण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या ६ महिलांना ‘ब्लेड-कटर’सारख्या शस्त्रांसह अटक करण्यात आली. त्यांचे काही साथीदार पसार झाले.

तर चौथी कारवाई १५ ऑक्टोबर रोजी कथेच्या मुख्य प्रवेशद्वारावर करण्यात आली यात ५ महिलांना चाकू, कटर, ब्लेडसारख्या घातक शस्त्रांसह पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या एका महिला टोळीकडे पोलिसांना एक डायरी मिळाली. धक्कादायक म्हणजे, या डायरीमध्ये महाराजांच्या पुढील दोन वर्षांत ज्या ज्या ठिकाणी कथा होणार आहेत, त्या कथांच्या तारीख, ठिकाण इत्यादींची सविस्तर माहिती नमूद होती. स्थानिक पोलिसांकडून ही माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविली जाणार आहे.

या संपूर्ण कारवाईमध्ये शिर्डी, राहता, कोपरगाव तालुका, संगमनेर तालुका, आश्वी, राहुरी, नेवासे, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह अनेक सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!