संगमनेर:
निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या दुष्काळी भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे विधिवत पूजन करण्यात आले. रब्बी हंगामाच्या तोंडावर उपलब्ध झालेला हा जलसाठा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ ठरणार आहे.
यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, लोहारे, कासारे आणि मेंढवण हा परिसर पिढ्यानपिढ्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे येथील पाझर तलाव कोरडे राहत असत, ज्यामुळे हाताशी आलेली पिके वाया जात होती. मात्र, महायुती सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे या भागाला हक्काचे पाणी मिळाले आहे.


या पाण्यामुळे केवळ शेतीचा प्रश्न सुटणार नसून, परिसरातील भूजल पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. सन १९६६ मध्ये उभारण्यात आलेल्या या तलावात यंदा २९.०३० दशलक्ष घनफूट पाणी साठवण्यात यश आले असून, यामुळे सुमारे १७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या यशामुळे शेतकऱ्यांमध्ये आता गहू, हरभरा आणि भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेण्याचा नवा विश्वास निर्माण झाला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाझर तलावातून शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी चाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देशही आमदार खताळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. कार्यकारी अभियंता प्रीतम शेवाळे यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक बाजू मांडताना सांगितले की, लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळेच वर्षानुवर्षे कोरड्या राहणाऱ्या या तलावात पाणी आणणे शक्य झाले आहे.
या जलपूजन सोहळ्याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे अधिकारी अमोल कवडे, दिलीप पोकळे, अण्णासाहेब सोमवंशी, दत्तू पोकळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
