संगमनेर:
जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून, संगमनेर तालुक्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सुमारे ६२ नागरिकांना ६ कोटी ६५ लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, या मोठ्या आर्थिक गुन्ह्यामुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, आश्वी बुद्रुक येथील रहिवासी योगेश रामदास जऱ्हाड यांना त्यांच्या परिचितांनी शेअर मार्केटमध्ये दरमहा १० ते ११ टक्के परतावा मिळेल असे स्वप्न दाखवले होते. यासाठी ‘अदमास डेप्ट कन्सल्टन्सी प्रा.लि.’ आणि ‘प्रथम वेल्थ मॅनेजमेंट’ या कंपन्यांचा आधार घेत आरोपींनी जऱ्हाड यांचा विश्वास संपादन केला.


या आमिषाला बळी पडून जऱ्हाड यांनी वेळोवेळी आरटीजीएस आणि फोन-पेच्या माध्यमातून १० लाख रुपये गुंतवले. सुरुवातीचे काही महिने त्यांना परतावा देऊन आरोपींनी विश्वास संपादन केला, मात्र त्यानंतर परतावा देणे बंद करून टाळाटाळ सुरू केली.
फिर्यादीने जेव्हा घुलेवाडी येथील जिजामाता प्राईड इमारतीमधील संबंधित कंपन्यांच्या कार्यालयात धाव घेतली, तेव्हा ते कार्यालय कायमचे बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता, केवळ जऱ्हाड यांचीच नव्हे तर तालुक्यातील इतर ६० ते ६२ नागरिकांचीही अशाच पद्धतीने एकूण ६ कोटी ६५ लाख ३९ हजार ८३७ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी महेश विश्वास मोरे, वैभव विठ्ठल काकड, राहुल शिंदे आणि विजय तबाजी काळे या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन प्रभाकर वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
