Sat. May 30th, 2026

संगमनेर:

नाशिक-पुणे महामार्गावरील वरुडी पठार शिवारात दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ वादातून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांना जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण प्रकारात महिला कलावंतांना मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला, तसेच कलावंतांकडील रोख रक्कमही लुटण्यात आली आहे.

बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पोखरी बाळेश्वर येथील कार्यक्रम आटोपून तमाशा फड माळेगाव पठारकडे जात असताना ही घटना घडली. वरुडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहने थांबलेली असताना एका दुचाकीस्वाराने तमाशाच्या वाहनाला कट मारला. यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संबंधित दुचाकीस्वाराने तातडीने आपल्या साथीदारांना बोलावून घेत मोठा जमाव एकत्र केला. या जमावाने कलावंतांना बेदम मारहाण करत महिलांचा विनयभंग केला. विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.

या घटनेमुळे राज्यभरातील लोककलावंतांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, मोठ्या संख्येने कलावंतांनी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

घारगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!