Sat. May 30th, 2026

संगमनेर:

येथील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या गंभीर हलगर्जीपणामुळे दत्तात्रय दळवी या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, तसेच रुग्णालय सील करावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

मागील वर्षी मार्च २०२५ मध्ये हृदयरोगाच्या उपचारासाठी दळवी यांना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांकडून दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे रुग्णाच्या हाताला गँगरीन झाला आणि उपचारांमध्ये जाणीवपूर्वक विलंब करण्यात आला.

या गंभीर स्थितीत डॉ. अभिजित कोरडे आणि डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांनी उपचारांऐवजी पैशांची मागणी केली आणि पैसे नसल्यास रुग्णाला अन्यत्र हलविण्यास सांगून हात झटकले.

यानंतर रुग्णाला नाशिक आणि त्यानंतर घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले, मात्र तिथे मिळालेल्या माहितीनुसार सोनांबेकर हॉस्पिटल प्रशासनाच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळेच रुग्णाच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला होता. अखेर किडनी निकामी झाल्याने दळवी यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे रुग्णाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संगमनेर पोलिसांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात डॉ. अभिजित कोरडे व डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांची कृती संशयास्पद ठरल्याने या गुन्ह्याची माहिती समोर येण्यास तब्बल आठ दिवसांचा कालावधी लागला असून यादरम्यान आरोपी पसार झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांना निवेदन दिले.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच त्यांचा वैद्यकीय परवाना त्वरित रद्द करावा आणि खटल्याचा निकाल लागेपर्यंत सोनांबेकर हॉस्पिटल सील करावे, अशी मागणी केली आहे. याशिवाय, डॉ. सोनांबेकर यांनी सर्व्हे नंबर १११/३७ मधील ओपन स्पेस आणि रस्त्यावर केलेले अतिक्रमण त्वरित हटवून दंडात्मक कारवाई करावी व ती जागा स्थानिक नागरिकांसाठी मोकळी करून द्यावी, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसून शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी उपजिल्हाप्रमुख अमरभाऊ कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण, फैसल सय्यद, जिल्हासंघटक रंगनाथ फंटागरे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, भिमाशंकर पावसे, पथ विक्रेता समिती सदस्य दीपक साळुके, युवासेना माजी शहर प्रमुख रवींद्र कानकाटे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, तालुका प्रमुख अशोक बढे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, उपतालुका प्रमुख भाऊसाहेब वराळे, परवेझ शेख, सदाशिव हासे, योगेश खेमनर, प्रकाश गायकवाड, असिफ तांबोळी, त्रिलोक कतारी, देविदास वराडे, रहिम बेग आणि संभव लोढा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक आणि अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!