संगमनेर:
शहरातील मोगलपुरा भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी १२० किलो गोमांस जप्त केले असून, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत गोमांसासह कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे असा एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहर आणि परिसरात अवैध कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष लक्ष होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या संदर्भात कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी पहाटे शहरात गस्त घालत असताना, मोगलपुरा येथील एका घरात जनावरांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने मोगलपुरा भागात छापा टाकला.
या छाप्यात मजरेहक मोहंमदनदीम कुरेशी (वय २८, रा. खाटीक गल्ली, मोगलपुरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावरून सुमारे ३६ हजार रुपये किमतीचे १२० किलो गोमांस आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी सुरी, सत्तूर व कुऱ्हाड असा १ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २७१, ३२५, ३(५) आणि प्राणी संरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार गणेश लबडे, दीपक घाटकर, विजय पवार, गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे आणि संतोष खैरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. संगमनेर शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.


