संगमनेर:
संगमनेर तालुक्यात कत्तलखान्यांचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले असतानाच पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. वडगाव पान ते तळेगाव रोडवरील हॉटेल अमर जवळ सापळा रचून पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो पकडला. या कारवाईत पोलिसांनी २३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून २९ जनावरांची सुटका केली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री एका आयशर टेम्पोमधून (क्र. PB 05 L 4157) जनावरांना अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने भरून मालेगावच्या दिशेने नेले जात होते. पोलिसांची चाहुल लागताच चालकाने अंधाराचा फायदा घेत वाहन महामार्गावरच सोडून पळ काढला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये २९ बैल आढळून आले, ज्यापैकी दुर्दैवाने दोन बैलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. जिवंत असलेल्या २७ जनावरांना सुरक्षितपणे सायखिंडी येथील जीवदया गोरक्षण संस्थेत हलवण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ लाखांचा टेम्पो आणि ८ लाखांची जनावरे असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, या तस्करीमागील मुख्य सूत्रधारांचा आणि फरार चालकाचा शोध पोलीस उपअधीक्षकांचे पथक घेत आहे.


