श्रीरामपूर:
वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना अहिल्या नगर जिल्ह्यात पिंपरी निर्मळ येथे समोर आली होती. यात आता श्रीरामपूरमधील नामांकित डॉक्टरचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्यांच्यासह आणखी दोन एजंटांना अटक केली आहे.
लोणी परिसरातील पिंपरी निर्मळ शिवारात केवळ १० हजार रुपयांत बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या या केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी डॉ. राहुल भनगे, अभिजित भुसाळ या एजंटसह गर्भलिंग निदान करणाऱ्या महिला नातेवाईकांवर लोणीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता पोलीस तपासामध्ये श्रीरामपूर मधील डॉक्टर रवींद्र कुटे या नामांकित डॉक्टरचे नाव समोर आले आहे. बुधवारी पोलिसांनी एजंट प्रदीप ढगे, निलेश भवर आणि श्रीरामपूरमधील प्रसिद्ध डॉ. रवींद्र कुटे यांना बेड्या ठोकल्या आहेत. राहता न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोग्य आणि महसूल विभागाच्या मदतीने निळवंडे कॅनॉलजवळील एका बंद खोलीत हा सापळा रचण्यात आला होता. या छाप्यात पोलिसांनी साडेचार लाख रुपये किमतीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, लॅपटॉप, मोबाईल आणि तीन आलिशान गाड्यांसह एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे तपासादरम्यान एजंट प्रदीप ढगे याच्याकडून आणखी एक मशीन हस्तगत करण्यात आले आहे.
समाजात एकीकडे ‘बेटी बचाओ’चा नारा दिला जात असताना, दुसरीकडे पैशांच्या हव्यासापोटी स्त्री भ्रूणहत्येला खतपाणी घालणाऱ्या या डॉक्टरांच्या कृत्यामुळे जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे. या रॅकेटचे धागेदोरे केवळ नगर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून अन्य जिल्ह्यांतही पसरलेले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टर, एजंट आणि संबंधित कुटुंबावर कारवाई करण्यात आली असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचे आशीर्वाद आहेत याचा कसून तपास लोणी पोलीस करत आहेत.
