संगमनेर:
शहरात दोन सख्या बहिणींचा वारंवार पाठलाग करून त्यांना मैत्री व मोबाईल नंबरसाठी त्रास देणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची १४ वर्षीय लहान बहीण ४ मे रोजी घराबाहेर असताना दुचाकीवरून आलेल्या सौरभ सुभाष पानसरे (रा. जाखुरी) याने त्यांना अडवून मोबाईल नंबर मागितला होता. त्यानंतर ८ मे रोजी देखील त्याने या दोन्ही बहिणींचा पाठलाग करून आईस्क्रीमच्या दुकानापाशी पुन्हा मैत्रीसाठी तगादा लावला.
हा त्रास एवढ्यावरच न थांबता, ९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने पुन्हा फिर्यादीला घराबाहेर बोलावून घेतले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी संबंधित तरुणाला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी २४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी सौरभ पानसरे विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८, ३५१(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक इमरान खान या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


