संगमनेर – संगमनेर शहरात अवैध धंद्यांमध्ये आता थेट ‘ड्रग्स’ (अमली पदार्थ) अर्थात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची भर पडल्याची धक्कादायक बाब पोलीस कारवाईतून उघड झाली आहे. शहरातील एका ‘सप्लिमेंट शॉप’मध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईला नशेसाठी लागणारी इंजेक्शन्स विनापरवाना विकली जात असल्याचे समोर आले आहे.
संगमनेर शहर पोलिसांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी नगरपालिकेच्या रस्त्यावरील लाल बहादूर शास्त्री चौकातील ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेन्ट शॉप’वर ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या दुकानात ‘MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA’ हे औषध अवैधरित्या विकले जात होते.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘डमी ग्राहक’ बनवून दुपारी सव्वा तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान दुकानात औषध खरेदीसाठी पाठवले. यावेळी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारे इंजेक्शन विनापरवाना विक्री होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ आदित्य किशोर गुप्ता या तरुणाला ताब्यात घेतले.
आरोपी आदित्य गुप्ता याच्याकडून पोलिसांनी एकूण २,२३,१२०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ६,६००/- रुपये किमतीच्या ‘MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA 10 ML’ च्या ०३ बाटल्या आणि ०९ इंजेक्शन सिरींजसह एक ॲपल कंपनीचा मोबाईल फोन आणि यामाहा कंपनीची मोटारसायकल (MH.15.HP.6646) यांचा समावेश आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२३, १२५ आणि २७८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित असल्याने गुन्हा दाखल होऊ नये यासाठी मोठा राजकीय दबाव आला होता. दुपारी साडेतीन वाजता कारवाई होऊनही राजकीय हस्तक्षेपामुळे तब्बल सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री उशिरा सव्वानऊ वाजता गुन्ह्याची नोंद झाली. यातून कलमे कमी करण्याच्या अनुषंगानेही दबाव आल्याची चर्चा शहरात आहे.
नाशिक, श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि पुणे येथून अवैध मार्गाने हे ड्रग्स संगमनेरात आणले जात असल्याची चर्चा आहे. या धोकादायक अवैध धंद्यामुळे संगमनेरच्या सुसंस्कृतपणाला बट्टा लागण्याची भीती व्यक्त होत असून, पालकांनी आणि नागरिकांनी वेळीच सावध होऊन पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
