Fri. May 29th, 2026

अहिल्यानगर – येथील सराफ बाजारात तब्बल दोन किलोपेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि शुद्ध सोने घेऊन सहा कारागीर अचानक बेपत्ता झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. चोरीस गेलेल्या या मौल्यवान सोन्याची किंमत सुमारे १ कोटी १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.

याप्रकरणी सोनार कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२) यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेरा, आणि स्नेहा बेरा या सहा संशयित कारागीरांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

रविवारी (२६ ऑक्टोबर) सायंकाळी देडगावकर यांच्या दुकानात कामाला असलेला कारागीर दिपनकर माजी जागेवर दिसला नाही. तो लवकरच परत येतो असे सांगून गेला. मात्र, बराच वेळ होऊनही तो न परतल्याने आणि त्याचे तसेच इतर सर्व कारागीरांचे मोबाईल फोन बंद लागत असल्याने संशय बळावला. अधिक चौकशीअंती या कारागीरांनी आपली घरे कुलूपबंद करून सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे उघड झाले.

केवळ फिर्यादी देडगावकर यांचेच नव्हे, तर प्रतीक देडगावकर, विजय जगदाळे, सागर गुरव, भरत शिराळकर, बरजहान शेख, प्रमोद गाडगे आणि इम्रान अली या आठ सोनार व्यावसायिकांचे सोने या कारागिरांनी चोरले आहे. गेल्या काही महिन्यांपासून विश्वास संपादन करून ही टोळी बनावटगिरीने चोरी करून फरार झाली आहे.

संशयितांचे पूर्ण आणि अचूक पत्ते उपलब्ध नसणे तसेच त्यांचे मोबाईल फोन बंद असल्याने पोलिसांना तपासात अनेक अडचणी येत आहेत. कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी माहिती दिली की, फरार झालेल्या कारागिरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तात्काळ कार्यान्वित करण्यात आली आहेत.

या धक्कादायक चोरीमुळे अहिल्यानगर सराफ बाजारात व्यापारी वर्गात असुरक्षिततेची आणि चिंतेची भावना वाढली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!