Sat. May 30th, 2026

पुणे/पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय ३५) याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल ४६ लाख ५० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. 

या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तपास अधिकारी असलेल्या उपनिरीक्षक चिंतामणी याने तक्रारदाराच्या आशिलाला गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्यासाठी आणि त्यांच्या वडिलांचा जामीन मिळवून देण्यासाठी सुरुवातीला २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. 

तक्रारदाराच्या वडिलांच्या गुन्ह्याचा तो तपास करत होता. तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर विभागाने सापळा रचला. त्यानुसार, ठरलेल्या ५० लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्यातील ४६.५० लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना त्याला रविवार (२ नोव्हेंबर) रोजी पुणे शहरातील पेठ रस्त्यावरील उंटाड्या मारुती मंदिरासमोर रंगेहात पकडण्यात आले. 

या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच स्वीकारल्याबद्दल अटक करण्यात आल्यानंतर, एसीबीने त्याच्याकडून लाचेची रक्कम, दोन महागडे मोबाईल फोन (सॅमसंग फोल्ड आणि ॲपल आयफोन) आणि अतिरिक्त रोख रक्कम जप्त केली आहे. सध्या एसीबीकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, या लाचखोरीत अन्य कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!