संगमनेर: शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी करायचे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना गंडा घालून ते ट्रॅक्टर परस्पर विकणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला श्रीरामपूर पोलिसांच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने जेरबंद केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे अनेक शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भालचंद्र अशोक साळवी (रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि अभिजीत सुनील भांडवलकर (रा. सिव्हिल हडको अहिल्यानगर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे आरोपी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत असत. ते शेतकऱ्यांच्या नावावर डाऊन पेमेंट भरून देण्याचे, मासिक ८०,०००/- रुपये देण्याचे, सुरुवातीचे हप्ते भरण्याचे आणि ट्रॅक्टर वापरण्याच्या मोबदल्यात ३०,०००/- रुपये महिना देण्याचे खोटे आश्वासन देत. या भूलथापांना बळी पडून शेतकरी आपली महत्त्वाची कागदपत्रे (आधार, पॅन, शेतीचे उतारे) आरोपींना देत. या कागदपत्रांच्या आधारे आरोपी फायनान्स कंपन्यांकडून ट्रॅक्टरवर कर्ज काढत आणि ट्रॅक्टर मिळाल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार होत असत.

राजूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने पथके पाठवून शिर्डी, अहिल्यानगर, श्रीगोंदा, नारायणगाव (पुणे) आणि सिन्नर (नाशिक) अशा विविध ठिकाणांहून ९ ट्रॅक्टर आणि २ मोटारसायकल असा एकूण ७१ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. इतर आरोपींचा शोध सुरू असून राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे पुढील तपास करत आहेत.