संगमनेर – शहरात ‘कॅफे सेंटर’च्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी अकोले नाका परिसरातील एका संकुलातील ‘कॅफे’वर छापा टाकून ही बाब समोर आणली आहे, ज्यामुळे शहरात खळबळ माजली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शनिवारी (दि. ०८) दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान, पोलिसांनी कॅफेमध्ये तपासणी केली असता, काही मुले-मुली आक्षेपार्ह अवस्थेत आढळले.

या कॅफेसाठी असलेला मूळ परवाना हा ‘मोबाइल शॉपी व मोबाइल दुरुस्ती’ साठी संगमनेर नगरपरिषदेकडून घेण्यात आला होता. मात्र, मूळ परवान्याचा गंभीर गैरवापर करून हा कॅफे अनधिकृतपणे सुरू असल्याचे या कारवाईत उघड झाले आहे.
याप्रकरणी, कॅफेचा चालक सोपान एकनाथ पवार (वय २४, रा. कोठे मळा) आणि जागेचा मालक योगेश सुरेश वारुंगसे (वय ४५, रा. स्वातंत्र्य चौक) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील बारवकर यांनी शहरात अशा प्रकारच्या अनधिकृत आणि अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘कॅफे’ संस्कृतीवर पोलिसांची धडक कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.