श्रीरामपूर: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर अपर पोलीस अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ ते १२९ खालील ‘चॅप्टर केसेस’च्या सुनावणीनंतर तब्बल १६ गैरअर्जदार/प्रतिवादींना थेट न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या कारवाईमागे दोन प्रमुख कारणे होती. काही गैरअर्जदारांनी पूर्वी दिलेल्या ‘चांगल्या वर्तणुकीचे’ बंधपत्राचे उल्लंघन करून पुन्हा गुन्हेगारी कारवाया केल्या, तर काही प्रतिवादींनी बंधपत्रासाठी योग्य व सक्षम जामीनदार हजर करण्यात कसूर केली. नियमानुसार जामीनदार हजर न केल्यास त्यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जाते.
कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार, ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांवर BNSS कलम १२९ अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आले होते. कोठडीत पाठवलेल्या १६ आरोपींमध्ये श्रीरामपूर शहर (५), संगमनेर शहर, कोपरगाव शहर, लोणी (प्रत्येकी ३) आणि राहुरी (२) पोलीस ठाण्यांतील आरोपींचा समावेश आहे.
कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची राज्यातील एवढी मोठी ही पहिलीच कारवाई असावी. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, पोलीस प्रशासन शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असल्याचे स्पष्ट झाले आहे.