Sat. May 30th, 2026

संगमनेर – शहरातील नामांकित संजीवन हॉस्पिटलचे संस्थापक आणि भाजपचे स्थानिक नेते डॉ. भानुदास डेरे यांनी कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक आणि हिंसक कृत्य केले आहे. मुलीने पत्नीला पाठिंबा दिल्याचा राग मनात धरून डेरे यांनी आपल्या पी.ए. सोमनाथ पवार यांच्यासह थेट फाॅर्च्युनर गाडी हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये वेगाने घुसवली. त्यांनी काचेचा दरवाजा तोडून एका कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे.

मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ७:२० वाजता संगमनेर येथील संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ही घटना घडली. डॉ. डेरे आणि त्यांची पत्नी विभक्त राहतात, आणि त्यांची कन्या डॉ. एकता वाबळे या आईला सपोर्ट करत हॉस्पिटलचे कामकाज पाहतात. याचाच राग डॉ. डेरे यांच्या मनात होता.

घटनेच्या वेळी, डॉ. डेरे यांनी पी.ए. सोमनाथ पवार याच्या साथीने हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये एम. एच. १७ डी. जे. १४१९ क्रमांकाची फाॅर्च्युनर गाडी वेगाने घुसवली, ज्यामुळे संपूर्ण काचेचा दरवाजा तुटला. त्यानंतर त्यांनी रिसेप्शन काउंटरवर लाथा मारून शिवीगाळ केली आणि आज एका-एकाला संपवतो असे ओरडले. या कृत्यासाठी पी.ए. पवार त्याला प्रोत्साहित करत होता.

यावेळी रिसेप्शनजवळ काम करणारे लॅब टेक्निशियन राजेंद्र अभंग यांनी सांगितले की, गाडी वेगाने माझ्या अंगावर घेऊन मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब समजताच डॉ. एकता वाबळे यांनी वडिलांच्या राजकीय वलयाची पर्वा न करता तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन डॉ. भानुदास डेरे आणि पी.ए. सोमनाथ पवार यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करत डेरेना तात्काळ अटक केली आहे. एका प्रतिष्ठित नेत्याने केवळ कौटुंबिक वादातून केलेले हे विकृत आणि हिंसक कृत्य शहरात चर्चेचा विषय ठरले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!