Sat. May 30th, 2026

संगमनेर: संगमनेर शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. शहर पोलिसांनी तब्बल ८ लाख २१ हजार रुपये किमतीचा ३२.८४५ किलोग्रॅम वजनाचा सुका गांजा जप्त केला असून, या प्रकरणी चार आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सलग दोन दिवसांत गांजा संदर्भात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसायाचे मोठे नेटवर्क समोर येत आहे.

स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी (मध्यरात्री ०१.४५ ते ०४.३० वाजेपर्यंत) शहराच्या केशव तिर्थ, गाळा नं. २, गोल्डन सिटी परिसरात ही महत्त्वाची कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी शुभम चंद्रकांत जाधव (२८, रा. इंदिरानगर), विशाल अशोक गायकवाड (२२, रा. जनतानगर), प्रथमेश अशोक पावडे (२२, रा. इंदिरानगर) आणि परवेझ दाऊद शेख (२६, रा. घुलेवाडी) या चौघांना अटक केली. हे चौघेही आरोपी प्लास्टिकच्या गोणीमध्ये ३२ किलो ८४५ ग्रॅम वजनाचा काळपट व हिरवट रंगाचा सुका गांजा (कॅनाबीस वनस्पतीचे शेंडे) विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना पोलिसांना आढळून आले.

या गंभीर गुन्ह्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल विजय आण्णा खुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक १०७३/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या चारही आरोपींविरुद्ध अंमली औषधे द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) चे कलम ८(क), सह २२(ब) आणि २०(ब) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुरुवारी नाशिकच्या नार्कोटिक विभागाने शहरालगत असणाऱ्या सुकेवाडीमध्ये छापेमारी करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा ४५६ किलो गांजा जप्त केला होता. या मोठ्या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या टीकेच्या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांनी केलेली ही धडक कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलीस कस्टडीदरम्यान आरोपींकडे हा गांजा कुठून आला आणि तो कोणाला दिला जाणार होता, यासंबंधीची माहिती मिळवली जाणार आहे. या माहितीच्या आधारे या अवैध रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर उभे आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!