संगमनेर:
संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडी येथील सव्वा कोटी रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणाने अखेर निर्णायक वळण घेतले आहे. दोन दिवसांपासून फरार असलेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार पडवळ उर्फ ‘दमल्या’ याला संगमनेर शहर पोलीस आणि नारकोटिक्स टास्क फोर्सच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी नारकोटिक्स टास्क फोर्सने सुकेवाडी परिसरात धडक कारवाई करत ४५६ किलो गांजा हस्तगत केला होता, याची किंमत सुमारे सव्वा कोटी रुपये आहे. या कारवाईत गांजाचा एवढा मोठा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली होती आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या कारवाईदरम्यान मुख्य आरोपी तुषार पडवळ हा पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. तर त्याच्या वडिलांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, ‘दमल्या’च्या अटकेसाठी पोलीस पथकांनी कसून शोध सुरू केला होता.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि अँटी नर्कोटिक टास्क फोर्सने आज (शनिवारी) सकाळी घुलेवाडी परिसरात अत्यंत चलाखीने सापळा रचला आणि अखेर ‘दमल्या’ला ताब्यात घेतले.
मुख्य आरोपी ‘दमल्या’च्या अटकेमुळे या गांजा तस्करीच्या आंतरराज्यीय किंवा आंतरजिल्हा नेटवर्कचा खुलासा होण्याची शक्यता आहे. एवढा मोठा गांजाचा साठा संगमनेरमध्ये नेमका कुठून आला आणि त्याचे जाळे कोठपर्यंत पसरले आहे, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. या प्रकरणातून आणखी कोणती मोठी नावे बाहेर येतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आरोपी तुषार पडवळ याला ताब्यात घेण्यात आले असून, आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले जाईल. या अटकेमुळे प्रकरणाच्या तपासाला गती मिळेल. डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस उपअधीक्षक संगमनेर.
