Sat. May 30th, 2026

संगमनेर: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ‘संगमनेरचा राजू’ या इन्स्टाग्राम अकाऊंट चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इन्स्टाग्राम आयडीवरून मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या नावाचा वापर करून आक्षेपार्ह सब-टायटलसह काही व्हिडिओ आणि मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या पोस्टच्या माध्यमातून दोघांची प्रतिमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. श्रीराम गणपुले यांना १७ डिसेंबर २०२५ रोजी या इन्स्टाग्राम अकाऊंटची लिंक मिळाली असता, त्यातील मजकूर अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ॲड. गणपुले यांनी तातडीने शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची भेट घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित इन्स्टाग्राम अकाऊंट चालविणाऱ्या व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या सायबर सेलच्या मदतीने या अकाऊंट चालकाचा शोध घेतला जात असून, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!