महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर
संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, राजकारण्यांच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विजयाची मिरवणूक संपल्यानंतर घरासमोर पडलेला ‘गुलाल’ साफ करण्यासाठी नगरपालिकेची गाडी बोलावली, या क्षुल्लक कारणावरून नवनिर्वाचित नगरसेविकेसह सात जणांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर (गल्ली नं. ९) येथील रहिवासी यशोदा राजेंद्र अभंग (वय ४०) यांच्या घरासमोर मिरवणुकीचा गुलाल आणि कचरा साचला होता. हा कचरा साफ करण्यासाठी त्यांनी नगरपालिकेचे स्वच्छता वाहन बोलावले होते. मात्र, नगरपालिकेचे वाहन का बोलावले? असा जाब विचारत नवनिर्वाचित नगरसेविका आणि त्यांच्या समर्थकांनी वाद घालण्यास सुरुवात केली.
घराची तोडफोड आणि जीवे मारण्याची धमकी
हा वाद इतक्यावरच थांबला नाही, तर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून यशोदा अभंग यांच्या घराच्या दरवाजाचे आणि खिडक्यांचे नुकसान केले. यावेळी जमावाने फिर्यादी महिला आणि साक्षीदारांना बेदम मारहाण केली. “तुम्ही वाहन कशासाठी बोलावले?” असे म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये ७ प्रमुख आरोपींसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा (रजिस्टर नंबर ११०२/२०२५) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये संजय मुरलीधर गाडे, वनिता संजय गाडे (नगरसेविका), शिवराज संजय गाडे, हरिष दिलीप थोरात, ओमकार थोरात, वैष्णव मुर्तडक, सागर कानकाटे यांच्यासह अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत. सोमवारी रात्री देखील एका नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला असताना, दुसऱ्याच दिवशी पुन्हा लोकप्रतिनिधीकडून असे कृत्य झाल्याने संगमनेरमध्ये संताप व्यक्त होत आहे.
