Sat. May 30th, 2026

संगमनेर: राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसांपासून नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या धुमाकुळाने शांतताप्रिय नागरिक धास्तावले आहेत. या गुंडशाहीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा थेट इशारा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला आहे.

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि तांबे परिवाराच्या नेतृत्वाखाली संगमनेरने विकासासोबतच सुसंस्कृत शहराची ओळख निर्माण केली आहे. मात्र, नगर परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांमध्ये या ओळखीला तडा देण्याचे काम झाले. आनंदाच्या मिरवणुकांचे रूपांतर थेट हिंसक संघर्षात झाले असून, ज्यांच्या खांद्यावर शहराच्या विकासाची जबाबदारी आहे, त्या नवनिर्वाचित नगरसेवकांनीच कायदा हातात घेतल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे.

शहरातील या तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आता ‘फुल ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने दोन गुन्हे दाखल केले असून दोषींवर कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले की, निवडणुकीतील जय-पराजय हा लोकशाहीचा भाग आहे, पण त्याचे रूपांतर हिंसेत होणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. मग तो लोकप्रतिनिधी असो वा सामान्य कार्यकर्ता; कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आम्ही कोणाचीही भीडभाड धरणार नाही, सर्वांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

वातावरण अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला असून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रियाही सुरू केली आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!