Sat. May 30th, 2026

संगमनेर (प्रतिनिधी):

संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने शुक्रवारी (२६ डिसेंबर) मोठी कारवाई केली. मुळा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची तस्करी करणारा १० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर भागात गस्तीवर होते. यावेळी बोटा शिवारातील कुरकुंडी फाटा येथे एक डंपर संशयास्पद स्थितीत उभा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता, डंपरमध्ये (क्र. MH 14 LX 7297) सुमारे २ ब्रास चोरटी वाळू आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचा डंपर आणि २० हजार रुपयांची वाळू असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डंपर चालक पिलाजी महादु नंदकर (वय ४१, रा. शेळकेवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक चौकशीत हा डंपर चेतन रामनाथ कजबे (रा. खंदरमाळवाडी) याच्या मालकीचा असून, त्याच्या सांगण्यावरून मुळा नदीपात्रातून ही वाळू चोरल्याची कबुली चालकाने दिली आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, अमोल आजबे आणि अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!