संगमनेर –
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहर परिसरात शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ लाख ४५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईची सुरुवात मदिनानगर भागात झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाला गस्तीदरम्यान मदिनानगर येथील गल्ली नंबर २ मध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला असता, तीन इसम जनावरांची कत्तल करताना मिळून आले. पोलिसांना पाहताच मुख्य आरोपी कासिफ असद कुरेशी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, मात्र पोलिसांनी गुलाम फरिद जावेद कुरेशी (वय ३०) आणि मोहंमद वसीम मुबारक अली (वय ३२) या दोन आरोपींना रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या. या ठिकाणाहून पोलिसांनी ९ लाख ३० हजार रुपये किमतीचे ३,११० किलो (३ टन) गोमांस आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे जप्त केली आहेत.
मदिनानगरमधील कारवाईनंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोल्हेवाडी रोडवरील हाजीनगर येथील एका काटवनात दुसरा छापा टाकला. या ठिकाणी २ लाख १५ हजार रुपये किमतीची एकूण १६ लहान-मोठी गोवंशीय जनावरे विना चारा-पाणी अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळली. ही जनावरे मुद्दस्सर हाजी कुरेशी याने कत्तलीच्या उद्देशाने आणली असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी या सर्व १६ जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईवेळी मुद्दस्सर कुरेशी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या संपूर्ण प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, आमेल आजबे आणि अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे.
