महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर:
पुणे-नाशिक महामार्गावरून कंटेनरमध्ये अत्यंत निर्दयतेने जनावरांची कोंबाकोंबी करून कत्तलीसाठी कर्नाटककडे नेली जाणारी गोवंश जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी २८ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली असून, ट्रकसह एकूण ३२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी कर्नाटकच्या चालकाला अटक करण्यात आली असून तस्करीचा हा नवा मार्ग पाहून पोलीसही अवाक झाले आहेत.

बुधवारी (३१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांना एका १० टायर कंटेनरमधून (KA-51 B-8920) जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या सूचनेवरून सारबंदे, पोलीस नाईक बापूसाहेब हांडे आणि सुनील ढाकणे यांच्या पथकाने तातडीने नाशिक-पुणे हायवेवर गस्त सुरू केली. पहाटे ४:३० च्या सुमारास हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ संशयास्पद कंटेनर अडवण्यात आला.
सुरुवातीला चालकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सखोल तपासणी केली असता कंटेनरमध्ये तब्बल २८ बैल दाटीवाटीने कोंडलेले आढळले. या कारवाईत १२ लाख ६० हजार रुपये किमतीची जनावरे आणि २० लाख रुपयांचा अशोक लेलँड कंटेनर जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी चालक सय्यद रिजवान दस्तगीर (वय ३२, रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले असून, ही जनावरे कुरण (संगमनेर) येथील आरबाज राजू शेख याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियमान्वये संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका केलेल्या सर्व जनावरांना सायखिंडी फाटा येथील जीवदया गोरक्षक पांजरपोळमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.
