Sat. May 30th, 2026

श्रीरामपूर: शहरातील वर्दळीच्या भागात आज दुपारी झालेल्या एका भीषण गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपूर हादरले आहे. अंत्यविधी आटोपून घरी परतत असताना राजकीय कार्यकर्ते असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

बंटी जहागीरदार दुपारी अडीचच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवरून घरी परतत होते. संत लूक हॉस्पिटलजवळ दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना अडवले. सुरुवातीला दगडफेक करून त्यांना दुचाकीवरून उतरण्यास भाग पाडले. जहागीरदार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच, हल्लेखोरांनी पिस्तूल काढून त्यांच्यावर अतिशय जवळून गोळ्या झाडल्या. पोटात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथके रवाना करण्यात आली असून शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. “नागरिकांनी शांतता राखावी, आरोपींना लवकरच अटक केली जाईल,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बंटी जहागीरदार यांची मोठी राजकीय ओळख होती. त्यांच्या आई माजी नगरसेविका होत्या, तर भावजई विद्यमान नगरसेविका आहेत. या हत्येमागे राजकीय वैमनस्य आहे की वैयक्तिक वाद, याचा तपास आता पोलीस करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!