नेवासा –
वीज चोरीचा दंड कमी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यातील ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेवासा येथील एका तक्रारदाराच्या घर आणि वॉटर प्लांटची वीज तपासणी करताना, आरोपींनी ४ लाख रुपयांच्या दंडाची भीती घातली होती. हा दंड टाळण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला २ लाखांची मागणी केली, जी तडजोडीनंतर १ लाख २५ हजार रुपये ठरली.
किरण गजेंद्र मोरे (वय ३४, सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग नेवासा) व शिवकुमार नारायण आचारी (वय ४७, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण नेवासा ग्रामीण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे.
तक्रारदाराने ३१ डिसेंबर रोजी एसीबीकडे धाव घेतली होती. १ जानेवारी २०२६ रोजी नेवासा फाटा येथील देवरे हॉस्पिटलजवळ सापळा रचण्यात आला. एसीबीने पावडर लावलेल्या नोटांच्या स्वरूपात ५० हजार रुपये स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे व पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने केली.
अटक केलेल्या आरोपींना शुक्रवारी सत्र न्यायाधीश आर. आर. हस्तेकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने आरोपींच्या आवाजाचे नमुने व पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
