श्रीरामपूर –
अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाची कंपनी विनापरवाना मोठी आर्थिक गुंतवणूक स्वीकारत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या नेतृत्वाखाली हनुमानवाडी येथे धाडसी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी संदिपराज मोहिणीबाई कपाटे (वय ३६) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गुंतवणुकीच्या व्यवहाराबाबत कोणताही अधिकृत परवाना मिळून आला नाही.

या छाप्यात पोलिसांनी कपाटे याच्या घरातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद साहित्य जप्त केले आहे. यामध्ये ९ पासबुक, १० चेकबुक, हिशोबाची वही, ॲपल कंपनीचा लॅपटॉप, ३ कॉम्प्युटर स्क्रीन, २ पेन ड्राईव्ह, कॅश काउंटिंग मशीन, २ तिजोरी, ३ वॉकीटॉकी आणि १ लाख ४ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम अशा मुद्देमालाचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याबाबत आणि आर्थिक व्यवहाराबाबत संदिपराज कपाटे याला कोणताही समाधानकारक खुलासा करता आला नसल्याने पोलिसांनी सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. या कारवाईत सतिष डोळे, दादाभाई मगरे या पोलीस उपनिरीक्षकांसह मोठ्या फौजफाट्याचा समावेश होता.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या नागरिकांनी ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने आपली कष्टाची कमाई गुंतवली आहे, त्यांनी स्वतःहून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह हजर राहून आपले जबाब नोंदवावेत. नागरिकांनी वेळीच पुढे येऊन तक्रार दिल्यास पोलीस तपासाला गती मिळेल आणि दोषींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करणे सोपे होईल, असे आवाहन वाघचौरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
