Sat. May 30th, 2026

संगमनेर, प्रतिनिधी-

परराज्यातील व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठवलेल्या कांद्याचे पैसे न देता सुमारे १९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी केरळ आणि तामिळनाडूतील दोन व्यापारी पेढ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील कुसुर येथील विक्रम रमेश बोचरे यांनी डिसेंबर २०२४ मध्ये आपला कांदा केरळमधील ‘एस. के. ट्रेडर्स’ आणि तामिळनाडूतील ‘श्री मरियम ट्रेडर्स’ या पेढ्यांना विक्रीसाठी पाठवला होता. या व्यवहारात एस. के. ट्रेडर्सकडून १३ लाख ७० हजार रुपये आणि श्री मरियम ट्रेडर्सकडून ५ लाख ७० हजार रुपये येणे बाकी होते. मात्र, कांदा माल मिळाल्यानंतरही संबंधित व्यापाऱ्यांनी ठरल्याप्रमाणे मालाचे पैसे न देता या मोठ्या रक्कमेचा अपहार केला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बोचरे यांनी पोलिसांत धाव घेतली. या अर्जाच्या सखोल चौकशीनंतर २ जानेवारी २०२६ रोजी संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये दोन्ही परप्रांतीय व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, परराज्यातील या व्यापाऱ्यांमुळे स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!