Sat. May 30th, 2026

अहिल्यानगर: अकोले आणि राजूर परिसरात विद्युत रोहित्रांमधील (ट्रान्सफॉर्मर) कॉपर चोरणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचे कॉपर आणि गुन्ह्यात वापरलेली १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १५,६५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये कोहंडी (ता. अकोले) येथील धरणाजवळील विद्युत रोहित्र फोडून अज्ञात चोरट्यांनी ३.५० लाख रुपयांचे कॉपर चोरले होते. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात समांतर तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे सुखरुप सुखदेव नांगरे (रा. पुणे) याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नारायणगाव परिसरातून सुखरुप नांगरे याला ताब्यात घेतले असता, त्याने चोरीचा माल पुण्यातील एका भंगार दुकानदाराला विकल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी सुखरुप नांगरे याच्यासह सागर शिवराम जाधव, शैलेश बाळू पारधी आणि चोरीचा माल विकत घेणारा भंगार विक्रेता मोहंमद तल्हा मोहंमद जुबेर (सर्व रा. पुणे जिल्हा) यांना अटक केली आहे. या टोळीकडून ६५ हजार रुपयांचे कॉपर आणि गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार (MH 12 EX 4340) जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील भास्कर केवळ आणि सुनील खंडागळे हे दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या टोळीच्या अटकेमुळे राजूर पोलीस ठाण्यातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. ही यशस्वी कामगिरी एलसीबीच्या पथकाने पूर्ण केली असून, आरोपींना पुढील तपासासाठी राजूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!