संगमनेर –
संगमनेर शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता वर्दळीच्या बस स्थानकावर चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असून, शनिवारी दुपारी गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र शिताफीने चोरले आहे. या धाडसी चोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घारगाव (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी आशालता मनोहर आहेर या आपल्या पतीसह नातेवाईकांना भेटण्यासाठी अकोल्याला जात होत्या. शनिवारी दुपारी त्या संगमनेर बस स्थानकावर आल्या. बसची वाट पाहत असताना आणि बसमध्ये चढण्याच्या घाईत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांहून अधिक वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अत्यंत शिताफीने ओढून नेले.

आपले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच आहेर यांनी तत्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल हासे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा बंदोबस्त असतानाही चोरटे बिनधास्तपणे वावरत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
संगमनेर बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून पाकीटमारी आणि दागिने चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलीस यंत्रणेसमोर या चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले असून, प्रवाशांनी स्वतःच्या दागिन्यांची आणि सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहन आता प्रशासनाकडून केले जात आहे.
