संगमनेर –
राहता शहरातून बेपत्ता झालेल्या सचिन कल्याणराव गिधे या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत, १७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दीपक अंबादास पोकळे या सराईत गुन्हेगाराला संगमनेरमधून त्याच्या साथीदारांसह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी जगतात पोलिसांचा मोठा वचक निर्माण झाला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, १० डिसेंबर २०२५ रोजी सचिन गिधे हे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे गेले असताना आरोपी प्रवीण वाघमारे याने त्यांच्या पत्नीला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. सचिन घरी न परतल्याने १५ डिसेंबर रोजी राहता पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सलग १५ दिवस तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपींचा माग काढला.

तपासादरम्यान मुख्य आरोपी दीपक पोकळे हा आपली ओळख लपवून पुणे, नाशिक, मुंबई आणि संभाजीनगर परिसरात वारंवार ठिकाणे बदलत होता. अखेर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील एका दगडाच्या खाणीत आरोपी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला वेढा घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दीपक पोकळे, गणेश दरेकर आणि प्रवीण वाघमारे यांनी हा खून केल्याची कबुली दिली. अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातून सचिन गिधे यांचा खून करून मृतदेह टायर आणि डिझेलच्या साहाय्याने जाळून विल्हेवाट लावल्याचे तपासात समोर आले आहे.
मुख्य आरोपी दीपक पोकळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि जबरी चोरी यांसारखे १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली १५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी आणि मोबाईल फोन असा एकूण १५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, आरोपी दीपक पोकळे याने जिल्ह्यात कोणाकडून खंडणी मागितली असल्यास किंवा कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी न घाबरता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
