संगमनेर-
शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचा सिलसिला सुरूच असून, नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळातही गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याचे चित्र दिसत आहे. बस स्थानक परिसरातील चोऱ्यांनंतर आता उपनगरांमध्येही चोरट्यांनी हैदोस घातला असून, गणेश नगर भागात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी धूम स्टाईलने ओरबाडून नेले आहे.

राजापूर येथील नंदा हासे या गणेश नगरमधील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात असताना ही घटना घडली. पाठीमागून विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ३ लाख ६७ हजार रुपये किमतीचे गंठण बळजबरीने हिसकावून पोबारा केला. या घटनेमुळे शहराच्या उपनगरांत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात सध्या पाकीटमारी, चैन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नूतन पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासमोर या चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले असून, गुन्हेगारांचा छडा लावून संगमनेरकरांची भीती दूर करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
