संगमनेर-
विश्वासाचा फायदा घेऊन जनावरे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता एका व्यापाऱ्याची ३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी कल्याण तालुक्यातील कळंब येथील जुनेद अहमद कुरेशी, यासीन अहमद कुरेशी आणि अहमद अब्बास कुरेशी या एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेरचे व्यापारी जब्बार हसन शेख यांच्याकडून जुन्या ओळखीचा फायदा घेत आरोपी जुनेद कुरेशी याने १ ऑगस्ट २०२४ रोजी २ लाख रुपयांची जनावरे उधारीवर खरेदी केली होती. त्यानंतर जुनेदचा भाऊ यासीन आणि वडील अहमद अब्बास कुरेशी यांनी शेख यांची भेट घेऊन जुने पैसे देण्याचे आश्वासन दिले व त्यांचा विश्वास संपादन करून १४ सप्टेंबर रोजी पुन्हा १ लाख ४१ हजार रुपयांची जनावरे गाडीत (MH 10 CR 5356) भरून नेली. मात्र, दोन्ही व्यवहारांचे मिळून एकूण ३ लाख ४१ हजार रुपये देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली.
फिर्यादी शेख यांनी वारंवार पैशांची मागणी केली असता, आरोपींनी त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जब्बार शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे करत आहेत.
