Sat. May 30th, 2026

घारगाव-

संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथे एका गर्भवती महिलेचा विनयभंग करून तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.

२ जानेवारी रोजी दुपारी पीडित महिला शेतातून घरी परतत असताना, आरोपी दस्तगीर शब्बीर पठाण याने तिला रस्त्यात अडवून तिच्या चारित्र्यावर संशय घेत विनयभंग केला. पीडिता अनुसूचित जमातीची असल्याचे माहित असतानाही त्याने तिला जातीवरून हीन वागणूक देऊन शिवीगाळ केली.

या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या पतीला आरोपी दस्तगीर आणि त्याचा भाऊ समीर शब्बीर पठाण यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच “काय करायचे ते करून घ्या, मी कोणाला घाबरत नाही,” अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!