संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर तालुक्यातील जोर्वे परिसरातून चोरीची एक खळबळजनक घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. जोर्वे येथील नवीन गावठाण भागात राहणारे अनिल गंगाधर बोरकर (वय ५६) यांच्या घरात ही चोरी झाली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरकर हे १० जानेवारीच्या सायंकाळी ६ वाजेपासून ते ११ जानेवारीच्या सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान घरी नसताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील शोकेसमध्ये ठेवलेले ७६ हजार रुपयांची रोख रक्कम, ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, १८ हजार रुपयांचे कानातले वेल व झुबे, ८ हजार रुपयांची सोन्याची लहान मुलांची चेन, ५ हजार रुपयांची चांदीची चेन आणि २ हजार रुपयांचे सोन्याचे मणी असा एकूण १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेबाबत अनिल बोरकर यांनी १२ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३३१(४) व ३०५ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर २०/२०२६ अन्वये दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे
त.
