संगमनेर –
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील (NDPS Act) दोन फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेरच्या भारतनगरपासून ते नाशिकपर्यंत केलेल्या या ‘फिल्मी स्टाईल’ कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
या मोहिमेची सुरुवात २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी मोहम्मद साद खालीद शेख (वय २४, रा. भारतनगर, संगमनेर) हा सध्या परिसरातच आहे.

या माहितीची खात्री पटताच श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि संगमनेर उपविभागीय पोलीस पथकाने संयुक्तपणे भारतनगर भागात सापळा रचला आणि साद शेख याला शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या प्राथमिक चौकशीतून या रॅकेटमधील धागेदोरे नाशिकपर्यंत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस पथकाने तातडीने नाशिकमध्ये धाड टाकून रेहान शेरखान पठाण (वय १९, रा. वडाळा, नाशिक) या दुसऱ्या फरार आरोपीलाही बेड्या ठोकल्या. या दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०२७/२०२५ अन्वये अमली औषधद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS) च्या कलम ८ व २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या विशेष पथकात पोलीस कर्मचारी अशोक गाडे, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांचा समावेश होता. सध्या पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या रॅकेटचे अजून कोणाशी संबंध आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
