संगमनेर –
संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ६ हजार किलो गोमांस, दोन पिकअप वाहने आणि कत्तलीसाठी आणलेली ९ जिवंत जनावरे असा एकूण ३३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जुना जोर्वे रोडवरील एका वाड्यावर छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा काही इसम जनावरांची कत्तल करत होते, मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन वाड्याच्या मागील दरवाजातून पळ काढला. घटनास्थळी दोन पिकअप गाड्यांमध्ये प्रत्येकी ३ हजार किलो मांस भरलेले आढळले, तसेच ६ गायी, २ बैल आणि १ कालवड अशा जनावरांना अत्यंत निर्दयीपणे डांबून ठेवल्याचे समोर आले.
या प्रकरणी मुद्दसर कुरेशी, वाहीद कुरेशी, अक्रम कुरेशी, शहबाज शेख आणि आदित्य जाधव यांच्यासह इतर १० साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या धाडसी कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
