Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर ‘पोक्सो’ कायद्यासह ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन – सर्वांसाठी मानवाधिकार संघटना’ आता सरसावली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यात आले आहे.

संबंधित घटनेतील आरोपी कलिम पठाण याने पाच महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. पोलीस प्रशासनाने तपासचक्रे फिरवून ३१ जानेवारी २०२६ रोजी आरोपीला मुलीसह ताब्यात घेतले. मात्र, आरोपीची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याच्यावर चोरी, घरफोडी, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत. अशा सराईत गुन्हेगारावर भारतीय न्याय संहिता आणि ‘पोक्सो’ अंतर्गत कठोर गुन्हा नोंदवणे आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन पीडित मुलीची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करावी आणि तिला कायदेशीर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपीचा वाढता गुन्हेगारी आलेख पाहता त्याच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) लावून त्याला कडक शासन व्हावे, जेणेकरून समाजात धाक निर्माण होईल. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला भविष्यात आरोपीकडून कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना आवश्यक पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी विनंतीही प्रशासनाला करण्यात आली आहे.

या संवेदनशील प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास मानवाधिकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा शेख बानोबी लियाकत यांनी दिला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!