संगमनेर:
चंदनापुरी येथील साईबाबा मंदिराच्या गाभाऱ्यातून चांदीच्या पादुका आणि भाविकाचा मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना संगमनेर तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. २९ जानेवारीच्या मध्यरात्री झालेल्या या चोरीचा तपास करताना पोलिसांनी प्रशांत मावस (खांडगाव), रोहित साळवे (सिन्नर) आणि अतुल बटवाल (ढोलेवाडी) या तिघांना श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी मंदिर चोरीची कबुली दिली असून, धक्कादायक म्हणजे याच टोळीने चंदनापुरी घाटात एका वाहनचालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याचेही तपासात उघड झाले आहे. आरोपींनी चोरलेल्या ९० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका एका सोनाराला विकल्या होत्या, त्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. यासह गुन्ह्यात वापरलेली ७० हजारांची मोटारसायकल, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कामगिरी केली. सध्या हे तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून सहायक फौजदार बी. वाय. टोपले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
