संगमनेर:
शहरातील अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली असून स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमजम कॉलनी परिसरात स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या एका मोठ्या गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक केली आहे.

६ फेब्रुवारीच्या पहाटे जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक ९ मध्ये जनावरांची कत्तल सुरू असताना एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपींची पळापळ झाली, मात्र पथकाने साहेब मोहीद्दीन कुरेशी याला जागीच जेरबंद केले. या कारवाईत ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे १५०० किलो गोमांस, दोन जिवंत गोवंश, वजनकाटा आणि धारदार शस्त्रे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी साहिल उर्फ साद कुरेशी आणि अयान कुरेशी हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
भरवस्तीत इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध कृत्य सुरू असताना स्थानिक शहर पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आणि यंत्रणेतील ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठांनी आता स्थानिक पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
