संगमनेर:
ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. शुक्रवारी रात्री घुलेवाडी परिसरातील अमृता लॉन्स येथे ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अमृता लॉन्समध्ये अत्यंत मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, ‘जनता बँड’ मालकीचा डीजे संच कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय वाजत असल्याचे आढळून आले. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याने पोलिसांनी तात्काळ डीजे साहित्यासह सर्व मुद्देमाल जप्त केला.


याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांडे यांच्या फिर्यादीवरून चालक योगेश बन्सी लांडुगे (वय ३५, रा. धांदरफळ) याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, विनापरवाना वाद्ये वाजवणाऱ्यांना या कारवाईतून कडक इशारा देण्यात आला आहे.
