संगमनेर:
स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर उपविभागात मोठी कारवाई केली आहे. शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी डिग्रस, पिंपरणे आणि देवगाव परिसरात एकाच वेळी राबवलेल्या या मोहिमेत वाळू माफिया आणि अवैध दारू वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २६ लाख ४५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने डिग्रस शिवारात सापळा रचून दोन डंपर पकडले. यावेळी प्रकाश भाऊसाहेब कोरडकर आणि फिरोज सुलतान शेख या दोघांना अवैध वाळू वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचे दोन डंपर आणि ४० हजार रुपयांची वाळू जप्त करून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत पिंपरणे गावातील ‘हॉटेल गरीब’वर छापा टाकून साहेबराव भिकाजी राहिंज याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४४ हजार रुपयांची देशी-विदेशी दारू आणि ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच देवगाव येथे मोटारसायकलवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या निलेश शशिकांत मुन्तोडे आणि अमोल गुलाब मुन्तोडे या दोघांवर कारवाई करून ६१ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, गणेश लोंढे, संतोष खैरे, योगेश कर्डीले आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता.
