Sat. May 30th, 2026

संगमनेर: 

नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. या टोळीच्या गुन्हेगारी कारवायांची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ म्हणजेच संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लावले असून सर्व आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, ३० जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथील तक्रारदार हरिष सोनार हे महामार्गावरून जात असताना चंदनापुरी घाटातील हॉटेल लक्ष्मीच्या पाठीमागे आरोपींनी त्यांना अडवले होते. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम बळजबरीने हिसकावून आरोपी पसार झाले होते.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सुरुवातीला कलम ३०९ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी विशेष पथकाद्वारे तांत्रिक तपास चक्रे फिरवली आणि चार आरोपींना निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रशांत मावस, रोहित साळवे, अतुल बटवाल आणि सिद्धार्थ मावस यांचा समावेश आहे. या आरोपींचा पूर्वइतिहास तपासला असता त्यांच्यावर संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

ही टोळी आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे हिंसेचा वापर करून गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाल्याने, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारीचे (कलम १११) कलम वाढवण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!