Sat. May 30th, 2026

संगमनेर:

स्थानिक पोलिसांच्या डोळ्यासमोर सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने मोगलपुरा भागात मंगळवारी (१० फेब्रुवारी) पहाटे धाड टाकून ११ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ७ जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून ४ जण फरार झाले आहेत.

राजवाडा परिसरातील बुद्धविहारासमोर अतिक कुरेशी आणि सलीम कुरेशी हे बेकायदेशीर कत्तल करत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि सहायक पोलीस निरीक्षक महादेव गुट्टे यांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता, काही लोक कत्तल केलेले मांस टेम्पोमध्ये भरताना आढळले.

पोलिसांनी पाठलाग करून फैज कुरेशी, सद्दाम कुरेशी, कलीम सय्यद, मुलमफरीद कुरेशी, अनस कुरेशी, फैसल कुरेशी आणि जुनेद कुरेशी या सात जणांना बेड्या ठोकल्या. मात्र, अतिक उर्फ सोनु कुरेशी, सलीम कुरेशी, हाशमी उर्फ बुड्डी कुरेशी आणि टेम्पो मालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे १८०० किलो गोमांस, ५.५० लाखांचा टाटा टेम्पो, रिक्षा, वजनकाटा आणि कत्तलीची शस्त्रे असा एकूण ११ लाख ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांच्या हद्दीत हे अवैध कत्तलखाने राजरोसपणे सुरू असताना एलसीबीने सलग ३-४ छापे टाकून त्यांची पोलखोल केली आहे. स्थानिक पोलिसांच्या या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!