संगमनेर –
तालुक्यातील देवतळे (देवगाव) आणि देवगड (हिवरगाव पावसा) येथील श्री खंडोबा मंदिरांमध्ये सोमवारी रात्री धाडसी चोरी झाली. माघ शुद्ध पौर्णिमेच्या यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केले होते, या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने दानपेट्या कापून त्यातील केवळ कागदी नोटा लंपास केल्या, तर चिल्लर पैसे मंदिरातच सोडून दिले.
मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. ही दोन्ही मंदिरे अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. एकाच टोळीने दोन्ही ठिकाणी चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात्रेच्या सांगतेनंतर लगेचच मंदिरांच्या गाभाऱ्यात घुसून चोरी झाल्याने भाविकांमधून संताप व्यक्त होत असून, पोलीस सध्या सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
