अकोले:
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारवर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख ८१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकोले हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला धामणगाव पाट ते कोतूळ दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ हालचाली करत हायटेक नर्सरी परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पद रित्या येणारी स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम.एच.०५ बी एक्स ५६३५) थांबवून तिची झडती घेतली असता, पोलिसांना कारमध्ये देशी दारूच्या ९२४ बाटल्या मिळून आल्या.

या प्रकरणी पोलिसांनी चालक अक्षय मारुती वाकचौरे (रा. परखतपूर, अकोले) आणि राजेंद्र बाळासाहेब तांबे (रा. पेमगिरी, संगमनेर) यांना जागीच ताब्यात घेतले. आरोपींची सखोल चौकशी केली असता, ही दारू त्यांनी संगमनेर येथील अभिजित रणशूर याच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दारूचा साठा, कार आणि दोन मोबाईल फोन असा लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला असून, फरार अभिजित रणशूरसह तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली असून, पोलीस आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.
