Sat. May 30th, 2026

संगमनेर:

संगमनेरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. आश्वी बुद्रुक येथील तलाठ्यासह त्याच्या दोन खासगी हस्तकांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कुणबी जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) मिळवून देण्यासाठी या आरोपींनी लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे (वय ५७) हा आश्वी बुद्रुक येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्याच्यासोबत लाचेची रक्कम स्वीकारण्यात मदत करणारे हितेश सोमनाथ घोडेकर (वय २८, रा. गजापूर रोड, ढोलेवाडी) आणि प्रतीक विजयकुमार कातोरे (वय २६, रा. सांगवी) या दोन खासगी व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी प्रतीक कातोरे हा तलाठी बोऱ्हाडे याचा सख्खा भाचा आहे.

तक्रारदार हे विद्यार्थी असून त्यांना स्वतःचा कुणबी जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी काढायची होती. तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयात आपली मोठी ओळख असल्याचे सांगून तलाठी बोऱ्हाडे याने तक्रारदाराकडून यापूर्वीच १३ हजार रुपये उकळले होते.

त्यानंतर तक्रारदाराच्या मोठ्या बहिणीच्या दाखल्यासाठी पुन्हा १३ हजार रुपयांची मागणी करण्यात आली, ज्यामध्ये दाखल्यासाठी ६ हजार आणि व्हॅलिडिटीसाठी ७ हजार रुपये ठरले होते. वारंवार होणाऱ्या या पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने अखेर अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

१७ फेब्रुवारी २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, तलाठी बोऱ्हाडे याने बहिणीच्या दाखल्यासाठी पहिल्या टप्प्यात ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार संगमनेर शहरात सापळा रचण्यात आला. बोऱ्हाडे याच्या सांगण्यावरून हितेश घोडेकर याने तक्रारदाराकडून ६ हजार रुपये स्वीकारले आणि ती रक्कम तात्काळ प्रतीक कातोरे याच्याकडे दिली. याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरीक्षक छाया देवरे आणि त्यांच्या पथकाने केली.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!